Pages

Wednesday, November 16, 2011

किल्ले विसापूर

किल्ले विसापूर

पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवनामावळात मोडणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण हा विसापूर किल्ला करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही.
इतिहास :
मराठे १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवडात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहचले. १६८२ मध्ये मराठांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
पाय-यांच्या सहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची रहाण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत.
गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी आपले लक्ष्य वेधून घेते. गडावर एक मोठे जातंही आहे
गडावर जाण्याच्या वाटा :  मुंबई-पुणे लोहमार्गावर मळवली या रेल्वे स्थानकावर उतरावे. येथून भाजे गावात यावे. भाजे गावातून विसापूर किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत.
१) पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाडा घेणे आवश्यक ठरते. भाजे लेण्यांना जाण्यासाठी पाय-या आहेत. या पाय-या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण मोडकळीस आलेल्या पाय-यांपाशी पोहचतो. येथे बाजूलाच एक मंदिर आहे.
२) दुस-या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख खिंडीतून डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते.
३) मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्स्प्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता आहे.
राहण्याची सोय : गडावर रहाण्यासाठी दोन गुहा आहेत.
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वतःच करावी.
पाण्याची सोय : गडावर पिण्याच्या पाण्यासाठी तळी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ : अडीच तास.

{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे

किल्ले हरिश्चंद्रगड

किल्ले हरिश्चंद्रगड

स्थान :
हा किल्ला पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर स्थित आहे.
भौगोलिक माहिती :
पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग बालाघाटची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे.
पौराणिक महत्व :
हरिश्चंद्र, तारामती आणि रोहीदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे.
गडावर जाण्याच्या वाटा :
सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत. त्यापैकी पाचनई कडील वाट आणि खिरेश्वरकडून जाणारी वाट दुर्गप्रेमी मंडळींना सोयीची आहे.खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने तिचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो.
कल्याण -अहमदनगर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरुन खिरेश्वरला जाता येते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होवू शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही आहे.
किल्ल्याबद्दल :
हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पुर्व बाजूला इंग्रजी यु आकाराची खिंड होय. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध टोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा होय.
रस्त्यातील व्याघ्रशिल्प  पायथ्यापासून टोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड टोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेवून जाते. खिंडीतून चढणारी वाटेवर खडकात पायठाण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो. येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बर्याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या धोपटमार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो.पाहण्यासारखी ठिकाणेयेथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.
हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे.
गणपती,हरिश्चंद्रेश्वर मंदिर मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते.
कोंकणकडा :
हरिश्चंद्रगडाचे सर्वात जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रुप पहावे लागते. येथून स्वच्छ हवेमध्ये कल्याण पर्यंतचा प्रदेश दिसतो.
हरिश्चंद्रगडावरुन शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरख, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली, अलंग, कुलंग, मदनगड, कलाडगड, भैरवगड (मोरोशी) तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.
गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे अविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे.
ऐतिहासिक महत्व
महाराष्ट्रातील इतर पारंपारिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रितील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे.

{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे

किल्ले हरगड

किल्ले हरगड

इतिहास : इतिहासात फारसा या गडाचा उल्लेख नाही कारण येथे कोणती मोठी लढाई झाली नाही. मुल्हेर गावात गेल्यावर हरगडचे दर्शन होते. समोर दिसणारा मुल्हेर,डावीकडे मोरागड आणि उजवीकडचा हरगड. या गडाची उंची मुल्हेरपेक्षा थोडी जास्त आहे
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
गडमाथा तसा विस्तीर्ण आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय. या पठारावर काही तटबंदीचे अवशेष आहेत. पाण्याची दोन टाकी आढळतात. एक पडके मंदिर आहे. वाड्यांचे काही अवशेष आढळतात. पाण्याच्या टाक्यांमधील पाणी पिण्यासारखे नसल्याने पाणी जवळ असणे आवश्यक आहे. गडफेरी मारताना पुढे सपाटीवर एक गुहा आढळते यात कपार भवानीचं मंदिर आहे. बाकी गडावर पाहण्यासारखे काही नसल्याने आल्या मार्गाने खिंड गाठून एक तर मुल्हेरगडावर जावे नाहीतर
मुल्हेर गावात जावे. गडफेरीस १ तास पुरतो.
गडावर जाण्याच्या वाटा :
गडावर जाण्यासाठी सध्या एकच वाट अस्तित्वात आहे. गडावर जाणारी वाट मुल्हेर गावातून जाते. मुल्हेर गावातून पुढे आल्यावर एक डांबरी रस्ता लागतो. या रस्त्याने वीस मिनिटे पुढे गेल्यावर दोन फाटे फुटतात. एक डावीकडे जातो
तर दुसरा वडाच्या झाडापासून पुढे जातो. ही वाट छोटाशा टेकडीवर असणार्या धनगर-वाडीपाशी पोहोचते. येथून उजवीकडे वळावे आणि थेट मुल्हेर व हरगड यामधील खिंड गाठावी. येथपर्यंत पोहचण्यास दीड तास पुरतो. खिंडीत डावीकडे जाणारी वाट आपल्याला मुल्हेरगडाकडे तर उजवीकडे जाणारी वाट हरगडाकडे घेऊन जाते. वाट फारशी मळलेली नसल्यामुळे अस्पष्ट झालेली आहे. या खिंडीपासून गडमाथा गाठण्यास एक तास पुरतो.
राहण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : नाही.
पाण्याची सोय : नाही. { मेल फॉरवर्ड } महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे

किल्ले हातगङ

किल्ले हातगङ

 सुरगणा नाशिक मधील एक तालुका.सह्याद्रीच्या पूर्व भागातीलएका रांगेची सुरवात याच तालुक्यापासून होते.यालाच सातमाळ रांग असे म्हणतात.या सातमाळ रांगेतील किल्ले म्हणजे जणु काय एक तटबंदीच.याच रांगेच्या उपशाखेवर एक छोटासा किल्ला आहे त्याचे नाव हातगङ या भागातील जनजीवन मात्र सामान्यच.थोडा फार आधुनिक सुविधा इथपर्यंत देखील पोहचल्या आहेत

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

गडावर प्रवेश करण्यापूर्वी चार दरवाजे लागतात.पहिल्या दरवाज्याच्या अगोदरच उजवीकडे कातळात वरच्या भागात कोरलेले पाण्याचे टाके लागते.येथेच कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे.गडाच्या पहिल्या दरवाज्याचे फक्त खांब शिल्लक आहेत.या दरवाज्याजवळच दोन शिलालेख कोरलेले आहेत.या दरवाज्यातून थोडे वर चढल्यावर आपण दुस-या संपूर्ण कातळातून खोदलेल्या बोगा सारख्या दरवाज्यातून आत शिरतो.या दरवाज्याला पाहून हरीहर किल्ल्याची आठवण येते.या दरवाज्याच्या बाजूला एक गुहासुध्दा कोरलेली आहे यात पाण्याची तीन टाकी आहेत.या दरवाज्यातून थोडे वर गेल्यावर गडाचा तिसरा आणि चौथा दरवाजा लागतो.गडमाथा खूप विस्तीर्ण आहे.संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो.दरवाज्यातून वर आल्यावर पाय-यांची एक वाट डावीकडे खाली उतरते.येथे मोठा प्रमाणावर तटबंदी आहे.ती आजही ब-यापैकी शाबूत आहे.समोरच एक पीर सुध्दा आहे.उजव्याबाजूच्या तटात एक कमान कोरलेली आहे ,पाण्याचे एक टाके सुध्दा आहे.हे सर्व पाहून आल्या वाटेने परतावे.आता दरावाज्याच्या उजवीकडची वाट धरावी.येथून थोडे वर गेल्यावर पाण्याचे टाके लागते थोडे अजून वर गेल्यावर पडक्या इमारतींचे अवशेष लागतात.येथे एक बुरुज वजा इमारतही आहे. थोडे खाली उरल्यावर पाण्याचा एक तलाव सुध्दा आहे.यामधील पाणी पिण्यास अयोग्य आहे.तलावाच्या समोरच किल्ल्याचे मोठे पठार देखील आहे.किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे.तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे.ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुस-या टोकाला जाते.वाटेत पाण्याची अनेक टाकी लागात. गडाच्या दुस-या टोकाला एक बुरुज आहे.संपूर्ण गडफेरीस एक तास पुरतो.असा हा हातगड नाशिक पासून १०० कि.मी वर आहे .नाशिकवरून एका दिवसात सहज पाहून होतो.किल्ल्याचे मोठे पठार देखील आहे.किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे.तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे.ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुस-या टोकाला जाते.वाटेत पाण्याची अनेक टाकी लागात. गडाच्या दुस-या टोकाला एक बुरुज आहे.संपूर्ण गडफेरीस एक तास पुरतो.असा हा हातगड नाशिक पासून १०० कि.मी वर आहे .नाशिकवरून एका दिवसात सहज पाहून होतो.
गडावर जाण्याच्या वाटा :
१. हातगडवाडी मार्गे
हातगडाला जाण्यासाठी नाशिक गाठावे.नाशिक सापुतारा मार्गावर बोरगाव नावाचा फाटा आहे.येथून एक रस्ता सुरगण्याला जातो तर दुसरा सापुता-याला जातो.सापुता-याला जाणा-या रस्त्यावर बोरगावपासून ४ कि.मी अंतरावर हातगडवाडी नावाचे गाव आहे हेच गडाच्या पायथ्याचे गाव आहे.गावातन एक डांबरी सडक कळवणला जाते या सडकेवरून पुढे जायचे ,हातगडवाडी डाव्या हाताला ठेवायची.पुढे डावीकडे एक बुजलेली विहीर लागते.या विहीरी नंतर ५ मिनिटांनी डांबरी सडक सोडायची आणि डावीकडची डोंगरधारेवर चढत जाणारी वाट धरायची.या वाटेन १५ मिनिटात आपण एका आंब्याच्या छाडाखाली पोहचतो.कागदावर जशी आपण तिरकी रेघ मारतो तशी या झाडापासून डोंगराच्या माथ्यापर्यंत तिरघी रेघ मारावी ही तिरकी रेघ म्हणजे गडावर जाणारी वाट.पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास पाऊण तास लागतो.
राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : आपण स्वतः करावी
पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे
जाण्यासाठी लागणारा वेळ : हातगडवाडी मार्गेपाऊण तास.

{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे

 

किल्ले सुधागड

किल्ले सुधागड


'गडकोट म्हणजे राज्याचे मूळ'. गडकोट म्हणजे खजिना . गडकोट म्हणजे सैन्याचे बळ. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. या गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत.
इतिहास :
सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून
असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. एखाा मोठा सत्तेखाली या गडाची जडणघडण झाली असावी. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. इ. स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की, 'साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.' शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून 'सुधागड' असे नामकरण केले.
गडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाच्छापूर' या गावातच संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीने सुधागड परिसरात असणार्या परली गावात हत्तीच्या पायी दिले.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : या गडाचा घेरा तसा मोठा आहे.गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात.गडावर पंत सचिवांचा वाडा आहे. यात ५० जणांची राहण्याची सोय होते. तसेच भोराई देवीचे मंदिर आहे. यामध्ये २५ जणांची राहण्याची सोय होते. येथे जंगलही ब-यापैकी आहे. आजुबाजूच्या जंगलाच्या परिसरात अनेक प्रकारची औषधी वनस्पती आढळतात. गडावरील पंत सचिवांच्या वाडाच्या बाजूला भोरेश्र्वराचे मंदिर आहे. तिथूनच पुढे गेल्यावर एक चोरदरवाजाची विहीर आहे. सचिवांच्या वाडापासून पुढे पाय-यांची वाट जाते आणि सरळ भोराई देवीच्या मंदिरात आणून सोडते. जर ही वाट सोडून खालची वाट पकडली तर पुढे पाण्याची टाके आहेत.
या टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. टाक्यांच्या डावीकडील वाट ही आपणांस चोर दरवाज्यांकडे आणून सोडते. ही वाट मात्र आता अस्तित्वात नाही.पाच्छापूर दरवाजा : या दरवाज्यातून गडावर शिरल्यास थोडे चढल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. पठाराच्या डावीकडे सिध्देश्र्वराचे मंदिर ,तसेच धान्यकोठारं,भाडांचे टाके,हवालदार तळे , हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते.गडावरील टकमक टोक : वाडापासून आपण पाय-यांच्या साह्याने वर आले की उजवीकडची वाट पकडावी. ही वाट मात्र हत्तीपागां मधून जाते.या वाटेने आपण सरळ एका टोकावर पोहचतो. या टोकाकडे आपण पाहिल्यावर आपल्याला रायगडावरील 'टकमक' टोकाची आठवण येते. या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड , कोरीगड, तैलबैल्या दिसतो. तसेच अंबानदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो.

गडावर जाण्याच्या वाटा :
सवाष्णीचा घाट : तैलबैला गावातून सरळ धोंडसे या गावी यावे. अथवा पाली गाव ते धोंडसे गाव हे अंतरही १२ कि.मी. आहे. पालीहून धोंडसे गावी यावे.तिथून गडावर जाण्यासाठी ३ तास लागतात. वाट फारच दमछाक करणारी आहे.वाट सरळसोट असल्याने चुकण्याचा संभव कमी आहे. या वाटेने आपण दिंडी दरवाजात येतो. नाणदांड घाट : एकोले गावातून घनगड डावीकडे ठेवून मावळती कडे निघावे.पुढे पाऊण तासाने नाणदांड घाटात पोहोचतो.पुढे एक बावधान गाव आहे. पुढे पाच्छापूरची दिशा धरून ठाकूरवाडीत यावे आणि मग गडमाथा अवघ्या दोन तासात गाठता येतो. पाच्छापूर मार्गेः डावीकडे सिध्देश्र्वराचे मंदिर ,तसेच धान्यकोठारं,भाडांचे टाके,हवालदार तळे , हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते. गडावरील टकमक टोक : वाडापासून आपण पाय-यांच्या साह्याने वर आले की उजवीकडची वाट पकडावी. ही वाट मात्र हत्तीपागां मधून जाते. या वाटेने आपण सरळ एका टोकावर पोहचतो. या टोकाकडे आपण पाहिल्यावर आपल्याला रायगडावरील 'टकमक' टोकाची आठवण येते. या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड , कोरीगड, तैलबैल्या दिसतो. तसेच अंबानदी व नदीच्या आजुबाजूच गावे हा परिसर दिसतो

दिंडी दरवाजा : सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट आपणांस दिंडी दरवाज्यात आणून सोडते. हा दरवाजा म्हणजे रायगडावरील 'महादरवाज्याची ' हुबेहूब प्रतिकृती. हे या किल्ल्याचे महाद्वार आहे. या द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. गडावर वाडाच्या मागील बाजूस चोरवाट विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून आता मात्र ते गाळाने पूर्ण भरले आहे. संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी चोरवाट पण आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत.त्यावर सुबक नक्षीकाम केले आहे.
राहण्याची सोय : पंत सचिवांचे वाडे येथे उपलब्ध असून येथे ५० माणसे राहू शकतात. तसेच भोराई देवीच्या मंदिरात देखील रहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय : जेवणाची सोय स्वतः केलेली असल्यास उत्तम. पण तसे शक्य नसल्यास गडावरती 'मोरे' नावाच्या गृहस्थाचे घर आहे. तेथे ४ ते ५ जणांची जेवणाची सोय होऊ शके
पाण्याची सोय : गडावरतीच अनेक हौद आणि तलाव असल्याने बारामही पाण्याची सोय होते
जाण्यासाठी लागणारा वेळ : दोन तास पाच्छापूर मार्गे, तीन तास दिंडी दरवाजा मार्गे.(धोंडसे मार्ग)  {मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे

किल्ले हडसर

किल्ले हडसर

 सह्याद्री म्हणजे दुर्गांची खाणच. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आहे. 'हडसर' हा असाच या भागातील सुंदर किल्ला आहे. नाणेघाटा पासून सुरुवात करून जीवधन ,चावंड , शिवनेरी , लेण्याद्रि, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी सहा दिवसांची भटकंती आपल्याला करता येते.

इतिहास :
हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड. सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून या काळात गड मोठा प्रमाणावर राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक नमुनाच आहे. बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाज्यांची दुक्कलं , नळीत खोदलेल्या पाय-या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे पाहणे म्हणजे दुर्गशास्त्रातील एक वेगळेच दुर्गवैशिष्टच ठरते. गडावरील मुख्य दरवाज्यातून वरती आल्यावर दोन वाटा फुटतात. यातील एक वाट समोरच्या टेकाडावर जाते. तर दुसरी वाट डावीकडे असणा-या दुस-या प्रवेशद्वारापाशी जाते. दुस-या दरवाज्यातून वरती आल्यावर समोरच पाण्याचे एक टाके आहे. यातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथेच समोर एक उंचवटा दिसतो. या उंचवटाच्या दिशेने चालत जाऊन डावीकडेवळल्यावर कडालगतच शेवटच्या खडकात कोरलेली तीन प्रशस्त कोठारे दिसतात. यांच्या कातळावर गणेशप्रतिमा कोरल्या आहेत. ही कोठारे राहण्यासाठी अयोग्य आहेत.येथूनच उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव लागतो. येथे महादेवाचे मंदिरही लागते. मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून मंदिराच्या सभामंडपात सहा कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाडात गणेशमूर्ती , गरूडमूर्ती तर एकात हनुमानाची मूर्ती स्थानापन्न आहे. मंदिराच्या समोरच एक भक्कम बुरूज आहे. मंदिराच्या समोरच एक तलाव आहे. पावसाळ्यात तलावात भरपूर पाणी साठते. तळ्याच्या मधोमध एक पुष्करणी सारखे दगडातील घडीव बांधकाम आहे. बुरुजाच्या भिंतीच्या उजवीकडे खाली उतरल्यावर एक बुजलेले टाके दिसते. येथून थोडे पुढे गेल्यावर कातळात खोदलेली प्रशस्त गुहा लागते. मात्र ही गुहा म्हणजे पहारेक-यांची देवडीच होय. मंदिराच्या समोरील टेकडीवरून माणिकडोह जलाशयाचा परिसर अत्यंत सुरेख दिसतो. समोरच चावंड , नाणेघाट , शिवनेरी , भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर न्याहाळता येतो. येथून परत फिरून प्रवेशद्वारापाशी यावे आणि परतीच्या वाटेला लागावे.

गडावर जाण्याच्या वाटा :
या किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. यापैकी एक वाट राजदरवाज्याची असून दुसरी वाट गावक-यांनी त्यांच्या सोयीसाठी दगडात पाय-या कोरून बांधून काढलेली आहे.कोणत्याही वाटेने गडावर पोहचण्यासाठी
हडसर या गावी यावे लागते. जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवाडा यापैकी कोणतीही बस पकडून पाऊण तासात हडसर या गावी पोहचता येते. हडसर या गावातून वर डोंगरावर जाताना एक विहीर लागते. येथून थोडे वर गेल्यावर डावीकडे पठारावर चालत जावे. पठारावरील शेतामधून चालत गेल्यावर १५ मिनिटांच्या अंतरावर दोन डोंगरांमधील खिंड व त्यामधील तटबंदी दृष्टिक्षेपात येते. खिंड समोर ठेवून चालत गेल्यावर अर्ध्या तासात आपण बुरूजापाशी येऊन पोहचतो. येथून सोपे कातळरोहण करून आपण किल्ल्याच्या दरवाज्यापाशी येऊन पोहचतो. वाटेतच डोंगरकपारीत पाण्याची दोन टाकी आढळतात. दुसर्या वाटेने म्हणजे या खिंडीकडे न वळता सरळ पुढे चालत जाऊन डाव्या बाजूस असणा-या डोंगराला वळसा घालून डोंगराच्या मागील बाजूस पोहचावे. येथून शंभर ते दीडशे पाय-या चढून गेल्यावर आपण खिंडीतील मुख्य दरवाज्यापाशी पोहचतो. ही राजदरवाज्याची वाट असून अत्यंत सोपी आहे. येथून किल्ल्यावर जाण्यास एक तास पुरतो.
राहण्याची सोय : महादेवाच्या मंदिरात ४ ते ५ जणांना राहता येते. मात्र पावसाळ्यात मंदिरात पाणी साठत असल्याने राहण्याची थोडी गैरसोयच होते.
जेवणाची सोय : वर किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वतःच करावी.
पाण्याची सोय : किल्ल्यावर प्रवेशद्वारातून वरती आल्यावर समोरच बारमाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ : १ तास

{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे
 

कुर्डूगड - विश्रामगड

कुर्डूगड - विश्रामगड

पुण्यापासून अवघ्या ९० कि.मी. पश्चिमेस असणारा हा एकाकी लहानखुरा किल्ला .त्याला विशेष प्रकाशात आणले ते कै.दत्तोबा पासलकर यांनी .सह्याद्रीच्या कुशीत पुणे व रायगड जिल्ह्यांच्या सरहद्दीवर रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात ह्याचा समावेश होतो, माणगावपासून २० कि.मी. वरील ह्या किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासून ७०० मीटर उंचीवर आहे समुद्रसपाटीपासून जरी उंची कमी असली तरी खाडी चढण किवा लांबच लांब उजाड मार्गाने हा किल्ला जवळ करावा लागतो .म्हणून हा सतत उपेक्षितच राहिला आणि राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे, चित्तथरारक प्रसंगही येथे घडल्याचे ज्ञात होत नाही.
किल्यानाजीकच पायथ्याशी चरी कुर्डाई देवीचे मंदिर आहे .त्यावरूनच किल्ल्यास किल्ले कुर्डू हे नाव मिळालं.बाजी पासलकरांनी विश्रांतीकालासाठी या किल्ल्याचा उपयोग केल्याने त्यासच विश्रामगड हेही नामाभिमान प्राप्त झाले असे समजते

किल्ल्यावर कसे जायचे ?


पुण्याहून सकाळी व दुपारी अशा दिवसात दोनदा एस.टी. बसेस सुटतात व त्या आपणास थेट मोसे खुर्द ह्या गावी नेतात .तेथून गाडीरास्त्याने आद्माल ,पडल्घर ,भुईनी ,मुगाव ,कोळशी ह्या रस्त्याने धामणव्हळ गाव उजवीकडे ठेवून वाघजाईच्या ह्गाताने खाली कोकणात उतरता येते .नुकत्याच पूर्ण झालेल्या वरसगावच्या बाजी पासलकर धरणामुळे हा रस्ता आता पाण्याखाली गेला आहे .गर्द वृक्षराजीतील घटने गेले असता सुळक्याप्रमाणे दिसणारा कुर्डू किल्ला नजरेस पडतो .पायथ्यावर असणाऱ्या कुर्डू पेठ ह्या गावातून अवघ्या १५-२० मिनिटांत आपणास किल्यावर पोहचता येते


पाहण्यासारखे बरेच काही


किल्याच्या पायथ्याशी कुर्दैचे अलीकडेच जीर्णोद्धार केलेले मंदिर व कुर्डेश्वर महादेवाचे मंदिर आहे. देवीचे देवळाकडून म्हणजेच पश्चिमेकडून थोडीशी चढण चढून गेले म्हणजे पाण्याचे टाके लागते. कुर्डू पेठ ह्या गावास येथूनच पाणीपुरवठा होतो .गावाची वस्ती प्रामुख्याने कोळी व धनगर जमातीची आहे .तेथून थोडेसे अवघड कड्यावरून मुरमाड ,घसरड्या वाटेने आपण एका प्रचंड शिलाखांडाशी येतो. येथून उत्तरेकडील हनुमान बुरजावर आपण येतो .या बुरुजावरच १ मीटर उंचीची हनुमानाची मूर्ती नजरेस पडते .

याच बुरजावर उभे राहून दक्षिणेकडे नजर टाकल्यास एक छोटा सुळका एका मोठ्या सुळक्यापासून अलग झालेला दिसतो दिसतो .या दोघांच्या मधील खिंडीत थोड्याश्या कौशल्याने जाता येते. अगदी खिंडीत आपणास एक नैसर्गिक खिडकी आढळते .तेथून कोकणातील दूरवरचा मुलुख सहज नजरेस पडतो

{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे
 

सोनार किल्ला

सोनार किल्ला

थरच्या वाळवंटात गेली 855 वर्षे उभा असलेला जैसलमेरचा अतिप्राचीन किल्ला सध्या अतिक्रतमणे आणि बेकायदा बांधकामांशी झुंज देत आहे. मध्ययुगीन कालखंडात सिंध आणि अफगाणिस्तान प्रांतातून होणारे हल्ले परतवणारा हा किल्ला या आक्रमणांपासून कसा वाचवावा , असा प्रश्न येथील स्वयंसेवी संस्थांना पडला आहे.
हा किल्ला पिवळी झाक असलेल्या दगडांत बांधला असल्याने चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी त्याचे नामकरण ' सोनार किल्ला ' ( सोनेरी किल्ला) असे केले होते. मात्र , या किल्ल्याची ही सोनेरी झळाळी आता पार उडून गेली आहे. किल्ल्याच्या आतील भागात मोठमोठी दुकाने , एम्पोरियम , हॉटेल उभी राहिली असून या सगळ्याच्या कचऱ्याचा भार हा शाही किल्ला वागवत आहे.
इ. स. 1212 मध्ये लोडवराच्या भाती सत्ताधाऱ्यांनी हा 99 स्तंभांचा हा किल्ला बांधला असून राजस्थानला भेट देणाऱ्या पर्यटकांचे हे मुख्य आकर्षण आहे. मात्र , किल्ल्याचे बाह्यरूप सुंदर दिसत असले तरी व्यापारी संकुलातून टाकल्या जाणाऱ्या कचरा आणि प्लॅस्टिकमुळे किल्ल्याचे अंतरंग विदुप झाले आहे , असे पर्यटन व्यवसाय महासंघाचे अध्यक्ष जितेंद सिंग यांनी सांगितले.
या किल्ल्याला वाचवायचे असेल तर त्याच्यावरचा हा ताण हलका केला पाहिजे , असे या संघटनेचे म्हणणे आहे. तसेच हा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला अधिकार तोकडे पडत आहेत , असेही जितेंद सिंग म्हणाले. जिल्हा परिषदेने आतापर्यंत किल्ल्याच्या संरक्षणासाठी अनेक वेळा लोकजागृतीचे प्रयत्न केले. मात्र त्याला अपेक्षित यश आले नाही. राजस्थान सरकार , भारतीय पुरातत्त्व विभाग सवेर्क्षण विभाग आणि ' र्वल्ड वॉच मॉन्युमेंट ' ही स्वयंसेवी संस्थेतफेर् काही वर्षांपूवीर् या किल्ल्याचा जीणोर्द्धार करण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र , भारतीय पुरातत्त्व सवेर्क्षण विभाग आणि राजस्थान सरकारने यातील पाच कोटी रुपयांचा वाटा देण्याचे नाकारल्याने ही योजना सरकारी फडताळातच पडून राहिली आणि सत्यजित रे यांनी नावाजलेला जैसलमेरचा ' सोनार किल्ला ' बेकायदा बांधकामांचे आक्रमण झेलत राहिला.

{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे

बेलापूर किल्ला

बेलापूर किल्ला

एकविसाव्या शतकातील शहर म्हणून नावलौकिक असलेल्या नवी मुंबई शहराला पेशवाईत विशेष मान होता. पेशवाईतील मोठे केंद म्हणून प्रसिद्धी पावलेल्या या शहरात आता इतिहासाच्या खाणाखुणा अगदी दुमिर्ळ झाल्या आहेत. त्याचेच प्रतीक आहे बेलापूरचा किल्ला. पोर्तुगीजांनी आरमाराचं महत्त्व ओळखून पूवीर्च्या साष्टी प्रांताभोवती (आताचे ठाणे) खाडीकिनाऱ्यावर किल्ले बांधले. त्यापैकी एक बेलापूर किल्ला होय. पारतंत्र्याला कंटाळलेली जनता स्वातंत्र्यासाठी धडपडत होती. या असंतोषाचंंं नेतृत्त्व बेलापूर गावाताील गंगाजी नाईक हा पराक्रमी पुरुष करीत होता. पेशव्यांनी वसईचा संघर्ष पुकारला तत्पुवीर् बेलापूर किल्ल्यावरचा लढा, ऐतिहासिक ठरला. दुदेर्वाने या लढ्याचे स्मरण स्थानिकांना राहिलेले नाही.
नवी  मुंबई शहराचा मरीन ड्राइव्ह म्हणून ओळखला जाणारा पामबीच मार्ग बेलापूरला ज्या ठिकाणी सुरु होतो. त्याच ठिकाणी उरणकडे जात असलेल्या रस्त्यावर एक मनोरा लक्ष वेधून घेतो. हा मनोरा ऐतिहासिक असेल याची सुतराम कल्पना वेगाने वाहने हाकणाऱ्या वाहनधारकांना नसेल. पण, हा दगडी मनोरा नसून पेशवे व 

इंग्रजांच्या काळचा टेहळणी बुरूज आहे. या बुरूजावरून शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवले जायचे. आता हा बुरूज कसाबसा अस्तित्त्व टिकवून आहे. बेलापूर किल्ल्याची शान असलेला पूवेर्कडचा अवघा एक बुरूज आज पडीक अवस्थेत आहे. आज या ऐतिहासिक वास्तूला आधुनिक वास्तूंनी वेढले आहे. शेजारीच सिडकोने पंचवीस वर्षापूवीर् अधिकाऱ्यांसाठी गेस्ट हाऊस बांधले पण किल्ल्याची डागडुजी करण्याचे मात्र टाळले. या किल्ल्याच्या बाजूला सनदी अधिकाऱ्यांच्या आलिशान वास्तू उभ्या राहिल्याने या किल्ल्याचे अस्तित्वच संकटात आले आहे.
बेलापूर किल्ल्यावर ११ आणि तटबंदीवर ६ अशा एकूण २० तोफा होत्या. मुंबई बेट, साष्टी, पनवेल या जलमार्गाबरोबर प्रबळगड, मलंगगड, कर्नाळा या किल्लावर नजर रोखण्याची जबाबदारी बेलापूर किल्ला पार पाडायचा. नारायण जोशी या पेशव्यांच्या पराक्रमी सेनापतीने बेलापूर किल्ल्यावर साहसी चढाई केली तेव्हा घनघोर लढाई झाली. ३१ मार्च १७३१ साली झालेल्या या लढाईत पेशव्यांनी चिवट पोर्तुगीजांना होणारा पाणीपुरवठा आणि रसद पुरवठा बंद केल्यामुळे मराठ्यांपुढे हतबल झालेला पोर्तुगीज किल्लेदार २८ एप्रिल १७३१ साली कुटुंबासह गलबतात बसून निघून गेला आणि पेशव्यांनी या किल्ल्यावर जरीपटक्याचे निशाण फडकवले. पेशव्यांच्या बेफिकिरीमुळे नंतरच्या काळात बिटिशांचा अंमल या किल्ल्यावर कॅप्टन चार्ल्स याच्या अधिपत्याखाली पुन्हा सुरु झाला. सवाई माधवरावांच्या कारकिदीर्त तोतया सुखनिधन नामक कनोजी ब्राह्माणाचे प्रकरण गाजले. पेशव्यांचं किल्लेदार मानेजी आंग्रे या किल्लेदारांनी भामट्याची वरात काढून त्याची रवानगी पुण्याकडे केली. मात्र सदाशिवभाऊंनी इंग्रजांबरोबर हातमिळवणी केल्याने २३ जून १८१७ साली हा किल्ला पेशव्यांच्या हातून गेला.

या किल्ल्याच्या पायथ्याशी आजही किल्ल्याशी संबंधितांचे वंशज वास्तव्यास आहेत. आजही ऐतिहासिक पाण्याची विहीर १७३२ साली बांधल्याची नोंद असलेली आहे. साधारणत: याच काळातले गायधनी आणि आताचे गोवर्धनी माता मंदिर आहे. आता या प्राचीन मंदिराचा विश्वस्त असलेल्या विधान परिषद सदस्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मंदिराचा जीणोर्द्धार हाती घेतला आहे. आज या किल्लाचा एकच बुरुज शाबूत आहे. मात्र काही वर्षांपूवीर् संपूर्ण किल्ला होता. पुकार या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी किल्ल्याचा काही भाग कोसळला. सिडकोच्या बेफीकिरीने मंदिराजवळील मोठा बुरुजही कोसळला. गेस्ट हाऊसचे बांधकाम करताना एक बुरुज पडला. दरसाली अश्विन महिन्यात या किल्ल्याच्या पायथ्याशी जत्रा भरते. आज दुरवस्थेतील हा किल्ला नवी मुंबईची शान आहे याचेच भान संबंधितांना राहिलेले नाही. किल्ल्याच्या आवारात झालेले बांधकाम याचा धडधडीत पुरावा आहे.


निष्क्रीय राजकारणी व सिडकोच्या बेफिकीरीचा उत्कृष्ट नमुना हा बेलापूर किल्ला आहे. आजही अनेकांना झाडाझुडपामध्ये किल्ला आहे याची जाणच नाही. कारण या किल्ल्याला पाहिजे तशी प्रसिद्धीच मिळालेली नाही. पूवीर् गोवर्धनी माता मंदिराच्या पायऱ्या चढून किल्ल्याची वाट चढता यायची. आता तीदेखिल सुविधा नाही. याठिकाणी कुंपण घालून किल्ल्यावर जाणारी वाटच बंद करण्यात आली आहे. दाट वनराईंमध्ये किल्ला शोधल्याशिवाय सापडत नाही. एकदा वाट सापडल्यावर पुन्हा वाट चुकण्याचा संभव अधिक आहे. शिवाय निर्मनुष्य भाग असल्याने व दाट झाडीमुळे सर्पांचा, विषारी प्राण्यांचा धोका असल्याने या तेजपुंज इतिहासाचा दौरा करताना जरा जपलेले बरे असते. सह्यादीच्या कड्याकपाऱ्यातून मावळयांच्या वाशीच्या पट्टयात लढाई केल्याची नोंद ऐतिहासिक बखरीमध्ये आहे. तसेच बृहस्पती स्वामींनी पेशव्यांना बेलापूर किल्ल्यासंबंधी लिहिलेल्या दस्ताऐवज बखरींचा रुपात वाचायला मिळतो. इंग्रजांनी बेलापूर किल्ल्यावर दप्तरखाना चालू करुन महसूल प्राप्तीचा दर्जा नंतर या भागाला दिला. याठिकाणी नंतर दप्तरखाना होता. या ठिकाणची संबंधित कागदपत्रे गहाळ झाल्याचा संशय व्यक्त केला जातो.


उरण परिसरातील खांदेरी उंदेरी सारखे किल्ले टिकवले जात असताना बेलापूर किल्ल्याचे अस्तित्व टिकण्याची आता शाश्वती राहिलेली नाही. महिनाभर झुंज देवून पेशव्यांनी स्वराज्यात दाखल करुन घेतलेला हा किल्ला आता आपल्याच राज्यात अखेरच्या घटका मोजत आहे. याकडे शिवरायांचे नाव घेवून राज्य करणाऱ्या राजकारण्यांचे दुर्लक्ष होत आहे.


आता पुरातत्व खात्याकडे हा किल्ला संरक्षित करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र लालफितीच्या कारभारामुळे यात अनंत अडचणी येत आहेत. आहेत. यासंदर्भात नुकतीच सरकारच्या अंदाज कमिटीने बेलापूर किल्ल्याची पाहणी केली. यावेळेस सिडकोमार्फत बेलापूर किल्ला संरक्षण व संरक्षित करण्याबाबत प्रेझेंन्टेशन करण्यात आले होते. भावीपिढीच्या माहितीसाठी या किल्ल्याचे अस्तित्व राखण्याची अत्यंत गरज असल्यानेच या कमिटीने बेलापूर किल्ल्याच्या संरक्षणासाठी तातडीने कार्यवाही करण्यास संबंधितांना सूचना केली आहे. 

{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे


 

किल्ले लोहगड

किल्ले लोहगड


किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांगः लोणावळा

जिल्हा : पुणे

श्रेणी : सोपी

पवनामावळात असणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचाक संरक्षक असणारा हा लोहगड पुणे – मुंबई हमरस्त्यावरून सहजच नजरेस पडतो. पुण्या आणि मुंबईपासून जवळ असल्या कारणाने येथे ट्रेकर्स मंडळींची नेहमीच ये जा चालू असते. किल्ल्याच्या पोटात भाजे आणि बेडसे या प्रसिध्द लेण्या आहेत.. मुंबई – पुणे रेल्वेमार्गावरील मळवली स्टेशनवर उतरून आपण किल्ल्याकडे जाऊ शकतो. महामार्गापासून जवळच असल्याने पायथ्याच्या गावात सर्व सुखसुविधा आहेत.

इतिहास : लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या.इ. स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक. इ. स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्‍हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ. स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड – विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ. स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ. स. १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंगर्‍यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला.इ. स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा-शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्‍यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुर्‍यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसर्‍या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते. सर्वप्रथम

१. गणेश दरवाजाः- ह्याच्याच डाव्या – उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीचीपाटिलकी देण्यात आली होती.येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.

२. नारायण दरवाजाः- हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई.

३. हनुमान दरवाजाः- हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.

४. महादरवाजाः- हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले.महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्र अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाणा आहे.उजवीकडे ध्वजस्तंभ आहे.याच्या जवळच एक तोफ काही हौश दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथ-यात बसवलेली आहे.अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी आढळते. या कोठीत राहाण्याची सोय होते.या कोठीत अनेक खोल्या आढळतात.दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवटयाचा भाग आहे , जिथे एक सुंदर शिवमंदिर आढळते.पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे.हे तळ अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे.ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते.नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे.हे तळं सोळाकोनी आहे.मोठा तळ्याच्या पुढे विंचुकाटाकडे जातांना वाडांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. या विंचूकाटास बघून आपल्याला आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाटयावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते . गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो,म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात.या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते. गडाच्या आजुबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाटा चा उपयोग होत असावा. या गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेण्या आवर्जून पाहव्यात.पावसाळ्यातील लोहगडाचे रुप पाहिले की मनोन्मनी गुणगुणतं…। ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी। आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी ॥

गडावर जाण्याच्या वाटा : लोहगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.

१) पूण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या पुढे असणा-या मळवली स्थानकावर उतरावे.तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणरी वाट पकडावी.वाट मोठी आणि प्रशस्त आहे.तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलिकडेच एक गाव आहे त्याचे नाव लोहगडवाडी.खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास प ास पोहचतो आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर पोहचतो.या मार्गेलोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.

२) लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडावाडी पर्यंत जाता येते.पवना धरणाकडे जाणा-या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो तेथून ३ ते ४ किं मी अंतरावर लोहगडावाडी आहे.उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत.साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे.मात्र येथे एसटी महामंडळाची सोय नाही.स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून ट्रॅक्सने जाता येते मात्र ट्रॅक्सभाडे १००० रु आहेत.

३) काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे.तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो.पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेक टेकडीवर जातो तेथून एक मळलेलीपायवाटआपणासलोहगडावाडीत घेऊन जाते.या टकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे.या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात.

राहण्याची सोय : लक्ष्मी कोठी रहाण्याची एकमेव सोय आहे.३० ते ४० जण आरामात राहू शकतात.

जेवणाची सोय : आपण स्वतः जेवणाची सोय करावी अथवा लोहगडवाडी मध्यक जेवणाची सोय होते.

पाण्याची सोय : बारामही पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ : २ तास.

{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे


 

तिकोना किल्ला

तिकोना किल्ला


 तिकोना किल्ला : नावाप्रमाणेच हा किल्ला त्रिकोणी आहे. चढायला अतिशय सोपा आहे. अर्ध्या तासात पायथ्यापासून वरपर्यंत जाता येतं. १६५७ साली शिवरायांनी हा किल्ला जिंकून घेतला. पवना, मावळ या परिसराची पाहणी करण्यासाठी या किल्ल्याचं स्थानं मोक्याचं होतं. त्याची जबाबदारी शिवरायांनी नेताजी पालकर यांच्याकडे दिली होती. संभाजी राजांची औरंगजेबचा मुलगा अकबर याच्याशी भेट इथेच झाली. तिथे काही काळ राहण्यासाठी त्याला संभाजी राजांनी परवानगी दिली होती. १८१८ साली हा किल्ला घेण्यासाठी ब्रिटिशांशी युद्ध झालं. त्यामध्ये किल्ल्याची हानी झाली. तुंग-विसापूर-लोहगड हे किल्ले आणि पवना डॅम असं अप्रतिम दृष्य इथून दिसतं. किल्ल्यावर छान मंदिर आहे. एक गुंफा आहे. त्यामध्ये १०-१५ जण राहू शकतात. पाण्याचं टाकंही आहे. तिथून बालेकिल्ल्यावर जाताना तटबंदी आणि बुरुजांचे अवशेष दिसतात. वरती महादेवाचं मंदिर आहे.

लोहगड व विसापूर किल्ले लोणावळ्याच्या पुढे असलेल्या मळवली इथून जवळ आहेत. तिथून भाजे गावात जायचं. लोहगड चढण्यासाठी मळलेली वाट असल्यानं चुकायचा प्रश्न येत नाही. वाटेत सुरुवातीला बौद्धकालीन भाजे लेणी लागतात. मुद्दाम थांबून बघावं अशा या लेण्या आहेत. तिथून साधारणा दीडेक तासात पायथ्याच्या लोहगडवाडी या गावापर्यंत येता येतं. तिथल्या पठाराच्या एका बाजूला लोहगड आणि दुसऱ्या बाजूला विसापूर किल्ला आहे. तिथून लोहगड किल्ल्याकडे जाण्यासाठी पायऱ्या सुरू होतात. लोहगड, विसापूर व तिकोना हे सातवाहनकालीन किल्ले आहेत. त्यांनी बहमनी, निझामशाही, आदिलशाही, शिवकाल अशा अनेक राजवटी पाहिल्या. इथल्या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होई. या परिसरात लेण्याही अनेक आहेत

{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे